परभणी- पर्यावरण संवर्धन आणि योगाचा प्रसार करत संपूर्ण जगाला गवसणी घालणारे परभणीतील विश्वभ्रमंतीवीर विष्णुदास चापके यांना जग प्रवासासाठी आर्थिक मदत झाली होती. परंतु, चापके यांनी विश्वभ्रमंतीनंतर शिल्लक पैशातून दुष्काळग्रस्तांच्या मुलांना पाठ्यपुस्तके वाटप केली आहेत.
मराठवाड्यात सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शिक्षण देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शैक्षणिक खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडाव्या लागतात. शासन आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देत असते, पण नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना महागडी पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. अत्यंत गरीब, गरजू, गुणवंत, आत्महत्याग्रस्त शेतकरी, दुष्काळ ग्रत्स्त आणि शेतमजुरांच्या मुलांना गरिबीमुळे पुस्तक घेणे परवडत नाही. हे विदारक चित्र बघून साडेतीन वर्षांत अनेक देश फिरून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आपला अभ्यासदौरा करत मायदेशी परतलेल्या विष्णुदास चापके यांनी अशा अडीचशे मुलांना पुस्तके वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, कृषिभूषण कांतराव देशमुख, पत्रकार अभिमन्यू कांबळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
साडेतीन वर्षांत 35 देशात जगभ्रमंती करून शिल्लक राहिलेल्या पैशातून त्यांनी ही पाठ्यपुस्तके वाटप केलीत. पुस्तकाअभावी कुणाचे शिक्षण सुटायला नको, या उदात्त हेतूने या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या पुस्तकांसाठी 1 रुपया अनामत रक्कम जमा करून ही पुस्तके देण्यात आली. पुढच्या वर्षी ही वापरलेली पुस्तके जमा केल्यास त्यांना याच अनामत रकमेवर पुढच्या वर्गाची पुस्तके दिली जाणार आहेत. शिवाय याव्यतिरिक्त जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर असे गरीब आणि होतकरू विद्यार्थी असल्यास त्यांना ही पाठ्यपुस्तके पुरविली जाणार असल्याचे चापके यांनी सांगितले.