परभणी - नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शुक्रवारी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर प्रचंड जनसमुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात समाजातील सर्व घटकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. यादरम्यान मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करून अग्निशमन दलाची एक गाडी फोडली. परभणी शहरासह पालम, गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या शहरात देखील कडकडीत बंद पाळून नागरिकत्व कायद्याचा निषेध व्यक्त केला.
देशभरात नागरिकत्व कायद्याचा कडाडून विरोध होत आहे. परभणीत देखील या कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लिम बांधवांसोबत अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. परभणी शहरात संपूर्ण बाजारपेठ, विविध रस्ते, दुकाने बंद ठेवण्यात आली. या बंदचा परिणाम एसटी महामंडळावर देखील झाला असून सर्व बससेवा ठप्प आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! 282 किलो बनावट खवा जप्त
शहरातील ईदगाह मैदानावरून निघालेला हा मोर्चा जिल्हा रुग्णालय, सुभाष रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड या मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसावला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या लोकांनी मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले.
या आंदोलाचा परिणाम बस सेवेवर झाला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी अकरा वाजेपर्यंत काही बस धावल्या. मात्र, त्यानंतर परभणी बस अगारासह इतर भागातून आलेल्या बस देखील आगारात जागेवरच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली.