परभणी - परजिल्ह्यातील एका व्यक्तीला प्लॉट घेऊन देतो, म्हणून त्याला 90 हजार रुपयांना गंडावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला परभणीच्या पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले आहे. तसेच तो चार महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असल्याने देखील त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
'परभणीच्या दत्तनगरात प्लॉट घेऊन देतो, म्हणून फसवले
परभणीतील दत्तनगरमध्ये प्लॉट घेऊन देतो, असे दीड वर्षांपूर्वी पोलीस शिपाई विनायक भोपळे यांनी परजिल्ह्यातील एका व्यक्तीस म्हटले होते. त्यासाठी त्या व्यक्तीकडून 2 जून, 2019ला 90 हजार रुपयांचा धनादेश घेतला. तो धनादेश स्वतःच्या बँकेच्या खात्यावरून वठवून ते पैसे घेतले. मात्र, दीड वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांनी संबंधिताला दत्तनगरमध्ये प्लॉट घेऊन दिला नाही. शिवाय, चालढकल करत रक्कमही परत केली नाही. परिणामी, त्या व्यक्तीस आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार केली होती.
'चार महिन्यापासून कर्मचारी होता गैरहजर
पोलीस शिपाई भोपळे हे 17 ऑगस्ट, 2020पासून कर्तव्यावर देखील अनधिकृतपणे गैरहजर असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे 'जबाबदार, कर्तव्यनिष्ठ पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असतानाही सर्वसामान्य जनतेची फसवणूक होणार नाही, असे अपेक्षित असताना भोपळे यांनी जाणीवपूर्वक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करत पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला', असे नमूद करत जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी भोपळे यांना सेवेनतून निलंबित केले आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील पोलास कर्मचाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यातील जिंतूर येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांना मदत केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. तर अन्य एका कर्मचाऱ्याला थेट बडतर्फ देखील करण्यात आले आहे. याप्रमाणेच पाथरी येथे देखील पैसे घेऊन एका गुन्ह्यात आरोपीला मदत केल्याचा आरोप असलेल्या उपनिरीक्षकासही पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. शिवाय गंगाखेड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले असून, गेल्या काही महिन्यात भ्रष्टाचार आणि बेशिस्त वागणुकीचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस अधीक्षकांनी कारवाई करून निलंबित केल्याने परभणीच्या पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - सरत्यावर्षाला साधेपणाने निरोप द्या; परभणी जिल्हा प्रशासनाचे जल्लोषावर निर्बंध
हेही वाचा - परभणीत दोन जुगार अड्ड्यांवर छापे; साडेसहा लाखांच्या मुद्देमालासह १६ जणांना अटक