परभणी - शहरातील दर्गा रोड परिसरात लहान मुलाला स्कुटीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून स्कूटी चालक आणि तेथील नागरिकांमध्ये वाद झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या वादातून स्कुटीचालकाने बंदुकीच्या दोन राऊंड फायर केल्या. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेच्या काही वेळानंतर याच परिसरात एका तरुणावर 4 जणांनी तलवारीने जीवघेणा हल्ला केला. ज्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती नाजूक आहे. या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - परभणी : महापालिकेने व्यवसाय परवान्यांचे आदेश रद्द न केल्यास आंदोलन करू - शिवसेना
स्कुटीचालकाचा गोळीबार
दर्गा रोड परिसरात शुल्लक कारणातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. वादानंतर त्यातील एक जण स्कुटीवर बसून पारवा रोड भागातून जात असताना त्या ठिकाणी लहान मुलाला स्कुटीचा धक्का लागला. त्यामुळे, या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी स्कुटी चालकाला थांबवले. त्यावेळी संबंधित वाहन चालकाने त्याच्या जवळील बंदुकीतून हवेमध्ये एक गोळी झाडली. त्यानंतर त्याने दुसरी गोळी झाडली, ती त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका कारच्या दरवाज्यात घुसली.
गोळीबारानंतर काही वेळात तरुणावर तलवारीने हल्ला
गोळीबारीची घटना घडल्यानंतर काही वेळातच दर्गा रोड परिसरातील कुर्बान अली शहा नगरात इमरान झैन नावाच्या युवकावर चार जणांनी तलवारीने आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवर बसून पसार झाले. जखमी झालेल्या इमरानला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जखमी इमरानची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, गुलाब बाचेवाड, विशाल बहात्तरे, पोलीस उपनिरीक्षक बोधले, मुपडे, केंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या घटनेमुळे परभणी शहरात भीतीचे वातावरण आहे. जखमी इमरान याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
गोळीबार आणि तलवार हल्ल्याच्या संबंधाचा शोध सुरू
जखमी इमरानवरील झालेला हल्ला आणि हवेत गोळीबाराचे प्रकरण, या दोन्हीचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. हल्ला करणाऱ्या चार जणांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तलवार हल्ल्यातील चार आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी सेलू रोडवर अटक केली असल्याची माहिती समजली आहे. त्याच्याकडून बंदूक आणि धारधार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - OBC POLITICAL RESERVATION : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार कारणीभूत - प्रितम मुंडे