परभणी - जिल्ह्यातील 60 वर्षीय व्यक्तीला काल कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज (शनिवार) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मृत्यूनंतर काही वेळातच महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण बरा होऊन घरी परतला आहे. तर सध्या 71 जणांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी 38 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 37 निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामध्ये वाघी बोबडे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा समावेश होता. ही व्यक्ती 15 मे रोजी पनवेल येथून गावी परतल्यानंतर गावातच क्वारंटाइन झाला होता. मात्र, त्यांना हृदयविकार असल्याने परभणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांना कोरोनाबाबत शंका वाटल्याने या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी त्यांच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी नांदेड येथे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला.
या 60 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. त्यानंतर या मृतदेहावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्याची माहिती देखील डॉ. नागरगोजे यांनी दिली.
शुक्रवारी रात्री उशिरा नांदेड येथून आलेल्या 87 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 74 वर पोहोचली आहे. यातील 2 जणांचा मृत्यू झाला, तर एक जण बरा होऊन घरी परतला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये 71 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.