परभणी - रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या आठ गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे. दुपारपर्यंत या आठ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवर अद्याप एकाही मताची नोंद झालेली नाही.
लासीना, थडीउक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावांचा बहिष्कारात समावेश आहे. या आठ गावांमधील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याची भूमिका घेतली. या गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने 26 सप्टेंबरला थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी पंचायत घेऊन राजकीय पदाधिकाऱ्यांनाही गावबंदी केली आहे.
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन असहकार पुकारले.