परभणी- जिल्ह्यातील नदी पात्रांमधील वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने वाळूमाफियांकडून बेसुमार वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरातून वाहणार्या गोदावरी नदी पात्रात छापा टाकून वाळू उपसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह 6 आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी मशीनरी, बोट, ट्रक, टिप्पर, वाळू साठा आदी सुमारे 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 11 आरोपी फरार दाखवण्यात आले असून त्यांची धरपकड सुरू आहे.
या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक राग सुधा यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी विशेष पथकाची स्थापना करून चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दितील कावलगाव शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात छापा मारण्याचे आदेश दिले. त्यावरून विशेष पथकाने काल रविवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली व वाळू उपसा साहित्यांना जप्त करून या प्रकरणी 17 जणांना आरोपी केले. त्यापैकी वाहनचालक, बोट चालक व मजूर अशा 6 जणांना अटक करण्यात आली असून बोटचे 11 भागीदार तथा मालक यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
एकूण मुद्देमालाच्या 15 लाख 60 हजार 500 रुपयांचा माल काल रात्रीच जप्त करण्यात आला. मात्र रात्री अंधार आसल्याने व नदी पात्रातून बोट बाहेर काढण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध नसल्यामुळे आज ती बोट जप्त करण्यात आली आहे. बोटची पाईपलाईन व टाक्यासह किंमत 6 लाख 18 हजार अशी असून, एकूण 21 लाख 78 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक राग सुधा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सह. पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ सह. पोलीस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, विजय घनसावंत, अतुल कांदे, चालक गजेंद्र चव्हाण, लक्ष्मण बोडके, मोहिज पठाण, सादिक पठाण, शेख रमीज यांनी मिळून केली आहे.