परभणी - सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात मात्र कोरोनाच्या संसर्गाचा अक्षरशः कहर झाला आहे. रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 49 नवीन रुग्णांची भर पडली असून, एकाचा नांदेड येथे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 263 वर जाऊन पोहचली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक परिस्थिती असणाऱ्या परभणीत देखील आता कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार झाला आहे. रविवारी परभणी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 49 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या आजपर्यंत एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या ही गंगाखेडची असून, त्या ठिकाणी तब्बल 32 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तर अन्य रुग्णांमध्ये परभणी शहरात 7, दैठण्यात 1, सेलू 1 ,जिंतूर तालुक्यातील कावी येथील 70 वर्षीय रुग्ण, पूर्णा तालुक्यातील रेल्वे कॉलनी येथील 39 वर्षीय पुरुष, सेलू तालुक्यातील वालुर येथे 40 वर्षीय पुरुष, वसमत रोडवरील जागृती कॉलनीमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. यात 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष आणि 52 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.
दरम्यान गंगाखेड येथे राधेश्याम भंडारी या उद्योजकाच्या मुलाचा शाही विवाह स्वागत सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्यात काही कोरोना बाधितांचा शिरकाव झाला. परिणामी गंगाखेडमध्ये आत्तापर्यंत 50 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर गंगाखेडमध्ये रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. गंगाखेडमधील भीषण परिस्थिती पाहता, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी मध्यरात्रीपासून पुढील 7 दिवसांसाठी पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली आहे, तर जिल्ह्यातील अन्य आठ तालुक्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आणखी 3 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे.
जिल्हा रुग्णालयात रविवारी नव्याने 38 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत संशयित रुग्णांची संख्या 3 हजार 183 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 992 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 263 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी 116 रूग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार उर्वरित 141 रुग्णांवर परभणीच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. एक रुग्ण गंभीर झाल्याने त्याला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते, त्याचा रविवारी मृत्यू झाला.
सेलू व मानवत तालुक्यातील दोन रुग्ण मुंबई येथे तपासणीसाठी स्वॅब देऊन आपल्या गावी परतले होते. मात्र, त्यांचा अहवाल मुंबई येथे पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर उपचार मात्र परभणीत सुरू आहेत. विशेष म्हणजे, अजूनही 35 संशयित रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे परभणीकरांची धाकधूक कायम आहे.
यातच दिलासाजनक बातमी म्हणजे. रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संक्रमीत कक्षातील 2 कोरोनाबाधितांना सुट्टी मिळाली. सदर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालय प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करीत रविवारी डिस्चार्ज दिला. त्यात गंगापुत्र कॉलनीतील 26 वर्षीय व 34 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.