परभणी - अगदी सुरुवातीपासून 'कोरोना' चा विषाणू आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या परभणीकरांना अखेर गुरुवारी एका तरुणाच्या रुपाने या विषाणूने घेरले आहे. त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या 9 नातेवाईकांसह अन्य 49 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 43 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. ज्यामुळे परभणीकरांसाठीही एक दिलासाजनक बातमी म्हणावी लागेल.
परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या आपल्या मेव्हण्याण्याकडे 13 एप्रिल रोजी पुणे येथे काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने भेट दिली होती. त्यावेळी त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने मेव्हण्याने तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याचा गुरुवारी पॉझिटिव्ह अहवाल परभणीत येऊन धडकला आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवसांची संचारबंदी लागू केली. शिवाय त्यापूर्वी या तरुणाच्या संपर्कात आलेली त्याची बहीण, मेहुणा आणि इतर नऊ नातेवाईक तसेच या नातेवाईकांच्या संपर्कात आलेली तब्बल 49 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठविले होते. या 49 पैकी 43 जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला मध्यरात्री प्राप्त झाले आहेत. यामध्ये जवळच्या 9 नातेवाईकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे. परभणीकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी असून अन्य 6 लोकांचा अहवाल मात्र प्रलंबित असल्याने त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तो अहवाल देखील आज शनिवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.
"29 कॉलनी, 4086 घरांचा काँटोंमेंट झोन जाहीर"
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परभणी शहरातील औद्योगिक परिसर आणि सभोवतालच्या 29 नगर व कॉलण्याचा तथा 4086 घरं असलेला भाग काँटोंमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. ज्यामुळे हा भाग सील करण्यात आला असून, या भागातील नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या नागरिकांना हव्या असलेल्या अत्यावश्यक बाबीचा पुरवठा महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक यासर्व कॉलनीतील रहिवाशांना देण्यात आले आहेत.