परभणी - सेलू येथील मोंढा भागात कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील कापसाला आग लागल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. यामुळे तारांचे घर्षण होऊन कापसाला मोठी आग लागली. यामध्ये 10 क्विंटल कापूस जळून खाक झाला. परंतु परिसरातील व्यापाऱ्यांनी आग वेळीच आटोक्यात आणल्याने पुढे होणारे मोठे नुकसान टळले.
सेलू येथील मोंढा भागात किशोर रावसाहेब झोल या व्यापाऱ्याचा कापसाने भरलेला ट्रक आज परराज्यात विक्रीसाठी जात होता. साधारण 10 ते 12 टन कापूस असलेला हा ट्रक क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) भरला होता. ट्रकच्या वर कापूस आल्याने त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. यावेळी तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडल्या. ज्यामुळे वरच्या बाजूच्या कापसाला आग लागली.
आग लागल्याचे दिसताच परिसरातील व्यापाऱ्यांनी पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. तसेच काही वेळात सेलू पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडीदेखील घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे ही आग पूर्णतः आटोक्यात आली. याकडे थोडेसे दुर्लक्ष झाला असते, तर गाडीमधील सुमारे 10 टनांहून अधिक कापूस जळून खाक झाला असता, शिवाय गाडीचे नुकसान झाले असते. मात्र व्यापाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने हा अनर्थ टाळला. याप्रकरणी पोलिसांकडून नोंद घेण्याचे काम सुरू होते.