परभणी - 'कोरोना'च्या धास्तीने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे कायदे मोडणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 995 दुचाकींवर आणि 34 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींविरुद्ध आतापर्यंत 236 गुन्हे दाखल करून 644 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदी तथा लॉकडाऊन काळात कोव्हिड-19 संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांना आपल्या तोंडाला रूमाल किंवा मास्कचा वापर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र, असे असतानाही लोक कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. रस्त्यावर बिनबोभाट फिरणे, कुठल्याही कारणांनी एकत्र जमणे, मास्क न वापरणे आदी प्रकार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे परभणी पोलिसांनी अशा बेजबाबदार लोकांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.
गेल्या 24 तासात सोनपेठ, पाथरी, गंगाखेड हद्दीत एकूण 25 इसमांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे लोक पायी व त्यांच्या मोटार सायकलने स्वतःच्या तोंडावर मास्क अथवा रूमाल न बांधता संसर्ग पसरवत असल्याने कलम 188, 269, 270 व 51 आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रमाणेच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश लागू असतानाही या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 102 आरोपींविरूध्द 23 गुन्हे दाखल केले आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात याप्रकरणी 236 गुन्हे दाखल असून 644 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. याखेरीज 24 तासात विनाकारण फिरणाऱ्या 76 आणि आतापर्यंत ९९५ दुचाकी आणि 34 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे गल्लीबोळातून येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी परभणी शहरात 72 ठिकाणी लाकडी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
शिबिरांमध्ये 974 स्थलांतरितांची सोय -
जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 26 ठिकाणी रिलीफ कॅम्प (निर्वासित शिबिर) चालू असून त्यामध्ये परप्रांतीय व राज्यातील स्थलांतरित कामगार व गरजुंना ठेवण्यात आले. त्यात 445 पुरूष, 307 महिला आणि 222 मुले अशा एकूण 974 स्थलांतरितांचा समावेश आहे. त्यांची याठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येत असल्याची माहितीदेखील पोलीस प्रशासनाने दिली आहे.