परभणी - सेलू शहरातील 60 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा आज (गुरुवार) पहाटे परभणीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. ही व्यक्ती प्रतिष्ठित व्यापारी असून, त्यांच्या जाण्याने सेलूच्या बाजारपेठेवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा हा 5 वा बळी आहे.
मृत्यू व्यापारी हे इतर आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना 7 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांना त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल काल (बुधवार) रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला होता. त्यानंतर आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यापूर्वी कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजचा जिल्ह्यातील 5वा बळी ठरला आहे. आज मृत्यू झालेले एक प्रतिष्ठित व्यापारी होते. ज्यामुळे सेलू तालुक्यातील बाजारपेठेत शोककळा पसरली आहे. दरम्यान, सेलू शहरात गेल्या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे संपूर्ण सेलू शहर आणि तीन किलोमीटर परीसरात संचारबंदी लावण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मज्जाव केला आहे. परभणी पाठोपाठ गंगाखेड आणि सेलू या दोन शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरात संचारबंदी लागू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 181 झाली आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 107 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 69 आणि सेलू येथील मुंबईत लाळेची तपासणीसाठी चाचणी देणाऱ्या 2 जणांसह एकूण 71 कोरोना बधितांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. या शिवाय आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 968 संशयितांची नोंद झाली असून, यातील 2 हजार 792 जणांचे लाळेचे नमुने निगेटिव्ह आले, तर 92 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच 95 नमुने अनिर्णायक अवस्थेत असून 47 जणांच्या लाळेची तपासणी आवश्यक नसल्याचा अहवाल प्रयोग शाळेने दिला आहे.