पालघर: डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत (Dahanu Tribal Development Project) येणाऱ्या तलासरी तालूक्यातील 'झाई आश्रम' ( Zai ashram school Palghar) शाळेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर रुगणालयात दाखल केलेल्या 13 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला झीकाची लागण झाली. इतर सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने या आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुढील 10 दिवस देखरेख ठेवले जाणार आहे. याचबरोबर झीका आजाराबाबत सर्वेक्षण व देखरेख करण्यासाठी केंद्रीय समिती डहाणू तालुक्यात दाखल झाली आहे. स्थानीय आरोग्यवस्थेबरोबर पाच किलोमीटर परिसरातील गर्भवती महिलांचे सर्वेक्षण कार्य देखील हाती घेण्यात आले आहे.
9 जुलै रोजी झाई आश्रम शाळेतील एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर डहाणू कुटीर रुग्णालयात दाखल केलेल्या 13 विद्यार्थ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये एका विद्यार्थ्याला झीका झाल्याचे निदान झाल्याने, झाई आश्रम शाळेच्या पाच किलोमीटर परिघात सर्व गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या परिसरातील डास , अळ्या व कीटक प्रयोगशाळेत पाठवले आहे. ताप, सर्दी, खोकला तसेच श्वसनाचे विकार असणाऱ्यांना देखील देखरेखीखाली ठेवून त्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या दृष्टीने घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
दाखल केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळल्याने; जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. आश्रम शाळेतून घरी गेलेल्या सर्व 192 विद्यार्थ्यांना पुढील दहा दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांची गाव निहाय यादी तयात करून संबंधितांवर जबादारी सोपविण्यात आली आहे. स्वाइन फ्लू हा 'इन्फ्लुएंझा ए' चा प्रकार असून या आजारामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने कळवले आहे. तसेच या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या टॅमीफ्लू गोळ्या घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
हेही वाचा: फ्लू लसीकरणामुळे अल्झायमर रोगाचा धोका 40 टक्के होतो कमी