पालघर- दुर्धर आजाराने त्रस्त व आर्थिक परिस्थितीला कंटाळून तरुणाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये समोर आली आहे. सोमनाथ मुरलीधर चौधरी (वय 33) असे या तरुणाचे नाव आहे. तरुणावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
सोमनाथ चौधरी हे वसईतील रहिवासी असून दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. चार वर्षांपूर्वी सोमनाथ व त्यांची पत्नी मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करत होते. मात्र दोघांनाही दुर्धर आजार जडला आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर त्यांची घरची परिस्थिती खालावत गेली. हाताला काम नसल्यामुळे घरी उपासमारीची वेळ आली. काहीजणांनी दिलेल्या मदतीवरच कुटुंबाची गुजराण चालत होती.
हेही वाचा-दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
घरची परिस्थिती अत्यंत खालावल्याने उपासमारीची वेळ
गेल्या वर्षी पत्नीचा दुर्धर आजारपणात मृत्यू झाला. त्यानंतर सोमनाथ यालाही दुर्धर आजार असल्याने मुलाला जवळ ठेवता येत नव्हते. त्यामुळे सहा वर्षाचा मुलगा विश्वनाथ याला कल्याण येथील एका अनाथ आश्रमामध्ये ठेवण्यात आले आहे. हाताला काम नसल्याने पैसा नाही. त्यामुळे स्वतःचा गुजराण करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. अनेकांकडे मदतीसाठी हात पसरले. पण इतरही किती मदत करणार ? त्यानंतर या काळामध्ये घरची परिस्थिती अत्यंत खालावल्याने उपासमारीची वेळ आली. प्रशासनाकडे मदतीचा धावा केला. मात्र जिल्हाधिकारी यांना भेटू न शकल्याने आपल्याला मदत मिळणार नाही, या विचाराने तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू-
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः जवळ असलेली फिनेल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न सोमनाथ चौधरी यांनी केला. ही बाब लक्षात येताच उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी रुग्णवाहिका बोलाविली. रुग्णवाहिकेतून चौधरी यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.