पालघर - वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरपाडा परिसरात गणपती उत्सवात डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मस्करीत एकाने गळा दाबल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा बबन दळवी, असे या मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वालीम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा - नालासोपारा येथे रेल्वे रुळावरून पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह मिळाला
वालीव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव डोंगरपाडा येथील रहिवासी गुरुनाथ जानू खुताडे यांच्या घरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. गुरुवार रात्री आजूबाजूला राहणारे मुले डीजेच्या तालावर नाचत होते. मुले नाचत असताना याच परिसरात राहणारा कृष्णा दळवी हा दारू पिऊन या ठिकाणी आला आणि इतर मुलांसोबत नाचू लागला. दारूच्या नशेत कृष्णा इतर नाचत असलेल्या मुलांशी मस्ती, चाळे, धक्का बुक्की करू लागला.
हेही वाचा - वृद्धाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेस्थानकात चालवली रिक्षा; पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल
त्यामुळे नाचत असलेल्या साईनाथ हरवटे याने त्याला घरी जाण्यास सांगितले. यावरून कृष्णा व साईनाथ यांच्यात वाद सुरु झाला. याच दरम्यान साईनाथने कृष्णाला घाबरवण्यासाठी मस्करीत त्याचा गळा दाबून त्याला जमिनीवर पाडले. जमिनीवर पडताच कृष्णा बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी साईनाथला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.