पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल लिमिटेड या कंपनीमध्ये व्यवस्थापन व कामगारांचा वाद विकोपाला गेला आहे. कामगार संघटना स्थापन करण्यावरून झालेल्या वादाने शनिवारी कारखान्यात तुफान हाणामारी, दगडफेक व तोडफोड झाली. या गंभीर घटनेत पोलीस व काही कामगारही जखमी झाले आहेत. खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
युनियनच्या वादातून हाणामारी - विराज ग्रुपच्या तारापूर येथील विविध प्लांटमध्ये सुमारे १० हजार कामगार काम करीत असून दि. १६ मे पासून मुंबई लेबर युनियनने बेमुदत संपाची हाक दिली. त्यामुळे कारखान्यातील वातावरण काही दिवसांपासून गंभीर असल्याचे समजते. याबाबत कामगार उपायुक्त तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी अचानक उफाळलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
पोलिसांसह, कामगार जखमी; मालमत्तेचे नुकसान - आठ-दहा हजार कामगार असणारा या कंपनी समूहात कामगारांमधील वाद विकोपाला गेला. कामगारांच्या गटाने विराज कंपनीत प्रवेश करून कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्याचप्रमाणे कंपनीत दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ही मारहाण करण्यात आली. यात पोलीस देखील जखमी झाले आहेत. या घटनेत कंपनीतील मालमत्तेचे व कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे व पोलिसांच्या वाहनांचेदेखील नुकसान करण्यात आले आहे.