पालघर (वाडा) - वाडा तालुक्यातील वरसाले ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा येथील राही रघु किनर ही महिला काल(मंगळवारी) संध्याकाळच्या सुमारास पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाली आहे. यात तिच्या हाताला, डोक्याला आणि कंबरेला जबर मार लागला आहे. तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्या महिलेला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविल्याची माहिती मिळाली आहे.
पाणी टंचाईची स्थिती असताना ग्रामपंचायतीकडून वाडा पंचायत समिती व वाडा तहसीलदारांच्याकडे पत्रव्यवहार करूनही आठवडा होऊनही पाणी टंचाई समस्या मार्गी न लागल्याचा आरोप वरसाले ग्रामपंचायत सरपंच प्रकाश शेलार यांनी केला आहे. या आदिवासी भागात पाणी टंचाई आहे. पाणी मिळविण्यासाठी महिला वर्गाला विहिरीत उतरून पाणी काढावे लागते. हे पाणीही विहिरीत मुबलक आहे, असे नाही. तर, येथे साठलेले पाणी एका भांड्यात भरून घ्यावे लागते, हे विदारक चित्र आहे.
जिल्ह्यातील आदिवासी डोंगराळ भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके इथल्या जनतेला बसत आहेत. वाडा तालुक्यातील वरसाले गावात 3 हजार लोकवस्ती आहे. 15 हून अधिक गाव-पाडे या ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्याचप्रमाणे या गावतील नवापाडा, जांभूळ पाडा, चारणवाडी, कुडुपाडा उंबरपाडा या भागात पाणी टंचाई आहे. पाणी मिळवण्यासाठी नवापाडा येथील एक महिला सायंकाळी सुमारास पाणी आणण्यासाठी गेली असता ती विहिरीत पडली. यात तिच्या हाताला व डोक्याला आणि कंबरेला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली.
पाणी टंचाईची भीषणता पाहता येथे विहिरिने तळ गाठला आहे, अशा परिस्थीतीत पाण्यासाठी जीव धोक्यात लावण्याची वेळ इथल्या महिला वर्गावर आली आहे, अशी माहिती तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश शेलार यांनी माहिती दिली. ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याची मागणी तहसिलदारांकडे केली आहे. मात्र, अद्याप याबाबतीत काही केले गेले नाही. पाणी टंचाई बाबत शासकीय यंत्रणेने दखल घेऊन टंचाई भागात टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी सरपंचांनी केली.