पालघर - नायगाव पूर्वेकडील रश्मी स्टार सिटी इमारतीच्या जी/२ मधील रूम नंबर १०१ मध्ये प्रियदर्शनी किशोर भुसा (३२) राहतात. त्यांना इमारतीचा सुरक्षारक्षक सत्येंद्र पांडे येता जाता टोमणे मारायचा. त्यामुळे त्यांनी मंगळवारी संध्याकाळी सुरक्षारक्षकाला चपलेने मारले. याचा राग मनात धरून त्यांना सोसायटीच्या लोकांनी आणि सुरक्षारक्षकाच्या पत्नी आणि मुलीने बांबूने मारहाण केली तसेच चावे घेतले. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रियदर्शनी या मारहाणीत जखमी झाल्या असून त्यांना वसई-विरार महापालिकेच्या सर डी.एम पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक आणि प्रियदर्शनी यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर महिलेला मारहाण प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकासह २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वालीव पोलिसांनी खजिनदार ब्रिज भूषण सिंग, सुरक्षा रक्षक सतेंद्र पांडे आणि सचिव विनोद यादव यांना शनिवारी वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
प्रियदर्शनी यांनी सुरक्षारक्षकाला शेरेबाजी करण्यावरून मारहाण केली होती. त्याचा बदला घेत पांडे याच्या पत्नी आणि मुलीने प्रियदर्शनी यांना काठी, चप्पलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात संपूर्ण सोसायटी तमाशा बघत होती. मात्र त्यांनी हे भांडण सोडवणूक केली नाही, असे दिसून येते. वालीव पोलिसांनी अद्याप जबर मारहाण करणाऱ्या महिलांना अटक न केल्याने त्या मोकाट असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रियदर्शनी यांनी केली आहे.