पालघर - वाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यात तसेच इतर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी नियमित पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यातील एकूण ८ प्रकल्पांमध्ये २२.०७ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. यातील मोठ्या २४.०७ टक्के, मध्यम ४.११ टक्के, तर लहान ६ प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के पाणी साठ्याचे प्रमाण आहे. तरी देखील जिल्ह्यातील वाडा, जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यांना पाणी उपलब्ध होत नाही.
जिल्ह्यातील ४६ गावांना १२९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाडा तालुक्यात ४ गावे आणि २८ वाड्यांना ४ टँकर्सद्वारे सरासरी १३ फेऱ्या, विक्रमगड तालुक्यात १ गाव आणि ८ वाड्यांना एका टँकरद्वारे सरासरी १९ फेऱ्या, जव्हार तालुक्यात १० गावे आणि २० वाड्यांना ६ टँकर्सद्वारे सरासरी २३.५ फेऱ्या, मोखाडा तालुक्यात २८ गावे आणि ६७ वाड्यांना २६ टँकर्सद्वारे सरासरी ९० फेऱ्या तर मोखाडा नगर पंचायत क्षेत्रात ३ गावे आणि ६ वाड्यांना ४ टँकर्सद्वारे सरासरी १३ फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.