वसई (पालघर) - वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणांमधील पाणीसाठा खालावला असून अवघे १० ते २० दिवस पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, धामणी धरणातील पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका आहे. मात्र, फक्त या एका धरणातील पाण्याची उचल वाढली, तर त्याचा साठादेखील कमी होण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहराला सूर्या (धामणी), पेल्हार व उसगाव या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सूर्या प्रकल्पातून १०० दलघमी, सूर्या टप्पा ३ मधून १०० दलघमी, तर उसगावमधून २० दलघमी आणि पेल्हारमधून १० दलघमी पाणी म्हणजेच एकूण २३० दलघमी पाण्याचा पुरवठा सध्या वसई, विरारकरांना केला जात आहे. परंतु, जून महिना संपत आला तरी पावसाने नावालाच हजेरी लावली असून हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा खालावत आहे. तीन धरणांपैकी उसगाव आणि पेल्हार धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. उसगाव धरणात ०.६१६ दलघमी आणि पेल्हार धरणात ०.१७३ दलघमी पाणीसाठा सद्यस्थितीत असून उसगाव धरणातील पाणीसाठा २० दिवस, तर पेल्हारमधील १० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे सूर्या (धामणी) धरणामध्ये ९०.१४१ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून हा एक वर्ष पुरेल इतका आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
उसगाव आणि पेल्हार या धरणातील पाणीसाठा संपल्यानंतर या दोन्ही धरणातून होणाऱ्या ठिकाणाला सूर्या धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. मात्र, सूर्यामध्ये पुरेसा पाणीपुरवठा असला तरीही कडक उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी गळतीची समस्या आणि अधिकचा पुरविण्यात येणारा पाण्याचा पुरवठा यामुळे पाण्याची पातळी खालावला असल्याचे सांगितले जात आहे. उपयुक्त पाणी कमी दिवस पुरेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.