पालघर - जव्हार तालुक्यातील खरोंडा येथील एका महिलेने मुलींचे पालनपोषण करायचे कसे या विविनचनेतून शुक्रवारी आपल्या दोन मुलींसह स्वतः विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आदिवासी क्षेत्र विकास योजना आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या महिलेच्या घरी भेट देली. तसेच या घटनेत बचावलेली चिमुकली रुषाली हिच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात भेट देऊन तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत विचारपूस केली. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गरीब आदिवासींना पोटाची खळगी भरत नसल्याने आत्महत्या करावी लागणे, हे दुर्दैवी असल्याची खंत पंडित यांनी यावेळी व्यक्त केली.
रूक्षणा जीवल हांडवा यांच्या दोन मुली खरोंडा येथील जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेत असून त्यापैकी मोठी मुलगी कुमारी सुमंत ही इयत्ता ३ री व जागृती ही इयत्ता १ ली मध्ये आहे. रुक्षणा यांच्या मृत्यूनंतर तीनही मुलींचे मातृछत्र हरपले आहे. पुढील शिक्षणासाठी कुमारी सुमंत व जागृती यांना जवळ असणाऱ्या देहेरे शासकीय आश्रम शाळेत निवासी प्रवेश द्यावा असे निर्देश यावेळी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी यांना दिले आहेत. तसेच लहान मुलगी रुषाली (वय-८ महिने) हिच्या नातेवाईकांसाबत बोलून बालगृहात ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबत ठरवेल जाईल असेही त्यांनी सांगितले. मुखमंत्र्यांनी तीनही मुलींच्या नावे त्या अठरा वर्षांच्या होईपर्यंत प्रत्येकी दोन लाख रुपये मुदतठेव ठेवण्याची सूचना दिल्या आहेत.
जव्हार तालुक्यातील पिंपळशेतपैकी खरोंडा या गावातील रुक्षणा या आदिवासी महिलेने मुलींना विष पाजून स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रुक्षणा या आपल्या चार मुलींसह इथे राहतात. जुनमध्ये त्यांच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली. त्याला कंटाळून रुक्षणा यांनी घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजले आणि स्वत:ही आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर रुक्षणा यांचा आधारच गेला होता. पाचवीला असलेले दारिद्रय, लहान मुली, रोजगाराचा अभाव यामुळे पैसेही नाहीत. त्यामुळे कुटुंबाचे पोट कसे भरायचे या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. दररोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने त्यांनी घरी असलेल्या दीपाली आणि रुषीली या मुलींना विष पाजले आणि स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केली. रुषाली ही फक्त ८ महिन्यांची असून उलटी केल्यामुळे तिचा जीव वाचला, तिच्यावर जव्हार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.