पालघर/विरार - विरार पश्चिम विराटनगर येथील ग्रीषम पॅलेस या सोसायटीत डिसेंबर २०१९ मध्ये मनिषा मनोहर डोंबळ या ६३ वर्षीय महिलेची लुटमारीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपीला विरार पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.
सदर महिलेची हत्या करून आरोपींनी घरातील साडे सात लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केला होता. त्यानुसार या गुन्ह्यात पोलिसांनी दोन आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली होती. मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विनोद पाडवी हा फरार असल्याने पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.
अखेर एका वर्षानंतर हा आरोपी भाईंदर येथे आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अटक केली आहे. हा आरोपी हत्या केलेल्या महिलेचा दूरचा नातेवाईक असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा - विशेष : किसान रेल्वेमुळे चिकू उत्पादकांचे बदलले अर्थकारण; रेल्वेमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कविता केली ट्विट
हेही वाचा - नालासोपाऱ्यात पोलीस सहआयुक्त कार्यालयाचे उद्घाटन; गुन्ह्यांवर बसणार अंकुश