पालघर - विरारमध्ये एका पंधरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल तांत्रिक अडचणीत अडकला. मृताच्या नातेवाईकांना तब्बल सात दिवसांपेक्षाही जास्त दिवस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ताटकळत राहण्याची वेळ आलीय. विरार पश्चिमेच्या ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सात दिवसांपासून मृताचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर ताटकळले आहेत. मात्र सात दिवस उलटूनही मृतदेहाचा न मिळाल्याने नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विरारमधील ग्लोबल सिटी येथे भाजी विक्री करणाऱ्या राजा गुप्ता या पंधरा वर्षाच्या तरुणाला गावगुंडांनी पोटात लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या घटनेच्या दोन दिवसानंतर २५ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. पुढील तपासासाठी विरार पोलिसांच्या विनंतीनुसार रुग्णालयामार्फत मृतदेहाची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र आज सात दिवस उलटूनही मृताचा कोरोना अहवाल आला नसल्याने कुटुंबीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून आहेत. रुग्णालय कोरोना चाचणीत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप मृताचा भाऊ अजय गुप्ता यांनी केला आहे.