पालघर - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी बोईसरजवळील मान कल्लाळे येथे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आले होते. मात्अर या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामस्थ व आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाविना परत जावे लागले आहे.
अधिकारी येत असल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ आणि आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, शशी सोनवणे, नीता काटकर, मोरेश्वर दौडा घटनास्थळी पोहोचले. या प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा करून सांगितले. बुलेट ट्रेन देशाच्या हिताची नसून या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत अनेकदा ठराव झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करू देण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करताच परतावे लागले. यापूर्वीही पाच वेळा अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करता परत जावे लागले आहे.