पालघर- कोरोनाविषयक जनजागृती करणाऱ्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नऊ कर्मचाऱ्यांच्या आरोग्यपथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात या गुंडांनी डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवक-सेविका, गट प्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी व वाहनचालक यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार मनोर पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना जनजागृतीसाठी गेलेल्या आरोग्य पथकावर हल्ला
पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे व जायशेत ग्रामपंचायत हद्दीत, पालघर जिल्हा परिषदेचा करोना जनजागृती करणारा चित्ररथ जात होता. या हद्दीवर उभ्या असलेल्या व नशेत धुंद असलेल्या दहा-बारा गावगुंडांनी हा रथ थांबवला व तुम्ही गावात आले तर कोरोना संक्रमण होईल त्यामुळे गावात जाऊ नका, असे पथकाला सांगितले. त्यानंतर या गावगुंडांनी पथकावर हल्लाबोल केला. मंगळवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. गावगुंडांनी आरोग्य पथकातील सर्वांना ठोशा बुक्क्यांनी व लाठी काठीने बेदम मारहाण केली. या शिवाय जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचीही या गावगुंडांनी मोडतोड केली.
दोघांना अटक फरार आरोपींचा शोध सुरू
मारहाण झालेले पथक कसेबसे सुटका करून स्वतःला वाचवत तेथून पळून मनोर पोलीस ठाणे गाठले. पोलीसांसह त्यांनी घडलेला प्रकाराची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन गावगुंडांना ताब्यात घेतले. इतर जण जंगलात पसार झाले. बुधवारी कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलीस या गावगुंडांचा शोध घेत आहेत. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.