पालघर - वसई-विरारच्या वेशीवर असणाऱ्या वाढीव व वैतीपाडा गावात जाण्यासाठी वैतरणा रेल्वे पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. १० दिवसात या पुलाने २ बळी घेतले असून यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वैतरणा रेल्वे पुलावर पादचारी मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे रेल्वे रुळात लोखंडी पट्ट्या टाकून बनविलेल्या पादचारी मार्गावरून नागरिकांना ये-जा करावे लागते. जीव धोक्यात घालून नागरिक येथून प्रवास करतात. मागील १० दिवसात याठिकाणी २ जणांचा बळी गेला आहे.
तर वैतरणा पुलावरून पुढे गेल्यावर वाडीव गावात जाण्यासाठी एक पूल आहे. परंतु, नुकत्याच आलेल्या पुरामुळे हा पूल तुटला. त्यामुळे लोकांनी तेथे झाडाचे ओंडके टाकून मार्ग बनविला. तर या मार्गावरून पुढे गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी हा पूल खचला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावे लागत आहे.
पावसाळ्यात याठिकाणी मोटारसायकल होडीत टाकून आणावी लागते. अनेक प्रसारमाध्यमे येथे आली आणि यासंदर्भात बातमी दिली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता तरी स्थानिक आमदार, खासदार याकडे लक्ष देतील का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, वैतरणा रेल्वे पुलावर सुरक्षित पादचारी पुलाची तत्काळ व्यवस्था करा किंवा निदान वाढीव रेल्वे स्थानक बनवा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र, अद्याप प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून येथील नागरिकांना आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही. त्यामुळे नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकून रेलरोको करण्याचा इशारा दिला आहे.