पालघर - मोदी सरकारला (२६ मे) रोजी ७ वर्षे पूर्ण होत आहेत. तर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनालाही ६ महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने निषेध दिनाची देशव्यापी हाक देण्यात आली आहे. (२६ मे) हा 'निषेध दिवस' म्हणून पाळण्याच्या हाकेला डहाणूमध्ये माकपा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत रॅली काढून काळे झेंडे घेत मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. यामध्ये माकपाचे आमदार विनोद निकोले, माकपा जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत गोरखना, धनेश अक्रे, राजेश दळवी, डॉ.आदित्य अहिरे, रेईस मिरजा, रूपाली राठोड, भरत कान्हात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
'शेतकरी आंदोलनाला पाठिंबा'
कोरोनामुळे हजारो लोक मरण पावले आहेत. काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सबंध देशातील ५०० पेक्षा अधिक किसान संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी 'संयुक्त किसान मोर्चा'द्वारे (२६ मे) हा 'निषेध दिवस' पाळण्याची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर डहाणू येथील रेल्वे स्थानकाजवळ काळे झेंडे दाखवत दिल्लीमध्ये आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिला.
'केंद्र सरकारचा निषेध'
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे, धुराच्या नळकांड्या फोडणे, पाण्याचा फवारा मारणे या प्रकारे शेतकऱ्यांचा अमानुष छळ केला आहे. तर, दुसरीकडे मोदी सरकार अंबानी-अदानीसारख्या उद्योगपतींना आणखी श्रीमंत करण्यासाठी शेतकरी-शेतमजूर, कामगारांवर हल्ले करत आहे. खासगीकरणाद्वारे त्यांनी सारा देश विकायला काढला आहे. यामध्ये रेल्वेच्या ट्रॅकवर अदानीच्या नावाने रेल्वे चालते, ही देशासाठी मोठी घातक गोष्ट आहे. शेतकऱ्यांबरोबर केंद्र सरकारने चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. शेतकरी चालला तर संपूर्ण देश चालतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दरम्यान, लोकांना धान्य मिळावे, वनाधिकार मिळावा, पाणी मिळावे अशा जनहितार्थ मागण्यांसाठी आम्ही लढत आहोत. भारत देश लोकशाहीला मानणारा देश असून, तो दडपशाहीला कधीही बळी पडणार नाही, असे मत आमदार निकोले यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलन नको, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका