वसई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार आणि बुधवारी अशा २ दिवसांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या वसई-विरार येथे राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी रोड-शो करत शक्ती प्रदर्शन केले. वसई येथील फादरवाडी येथे जनतेला संबोधित करताना त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता त्यांच्यावर व बहुजन विकास आघाडीच्या कामकाजावर टीका केली. गुंडागिरीला मोडून काढून, वसईच्या जनतेला आता मोकळा श्वास घेण्यासाठी शिवसेना मदत करेल, असे ते यावेळी म्हणाले.
"वसईकरांनो तुम्ही कुणाचे गुलाम नाही, तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात. तुमच्यावर कोणीही गुंडागर्दी करत असेल तर, ही गुंडागर्दी प्रत्येक गल्लीबोळात आम्ही युतीचे कार्यकर्ते आणि सरकार म्हणून मोडून काढल्याशिवाय राहणार नाही", असे वचन द्यायला मी येथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पालघर लोकसभेची जागा भाजपने शिवसेनेला देऊ केली. त्यानंतर भाजपचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला व त्यांना पालघर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे २ दिवसाच्या पालघर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान वसई येथे रोड-शो करत, त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले.