पालघर: देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच विरामधून एक दुर्देवी घटना घडली आहे. विरारच्या कारगिल नगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान वीजेचा झटका लागून २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिरवणूकीत दुर्घटना: गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री नऊ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. घटनेची खबर मिळताच स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, भीम सैनीक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे ,नायब तहसीलदार सीके पवार यांनी घटना स्थळाला भेट दिली.
दोन तरुणांचा जागीच मृत्यू: कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) सहा जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील सही जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८) राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) तीन गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. तर मिरवणूक संपवून जाताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मर धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडली. विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.