पालघर - ग्रामीण भागातील दळणवळणाच्या साधनांच्या अपुरऱ्या सुविधांमुळे आणि रस्त्यांअभावी रुग्ण आणि गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पालघरमध्ये अद्ययावत दुचाकी रूग्णवाहिका प्रयोग करण्यात आला. अलर्ट सिटीझन फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पालघर जिल्ह्यात 2 अद्ययावत अशा दुचाकी रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
आणखी 23 दुचाकी रूग्णवाहिका येणार
पालघर जिल्ह्यात आदिवासी बहुल असलेल्या ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना पायपीट करावी लागते. तसेच जव्हार, मोखाडा, विक्रमगड यासारख्या भागात गरोदर महिला आणि रुग्णांना डोलीतून किंवा खांद्यावरून रुग्णालयापर्यंत पोहोचवले जाते. अनेक भागात रूग्णवाहिका पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना व गरोदर महिलांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यावर उपाय म्हणून अलर्ट सिटीझन फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रोजेक्ट आरोग्यमच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात 2 अद्ययावत अशा दुचाकी रूग्णवाहिका दिल्या आहेत. अजून 23 दुचाकी रूग्णवाहिकांचे काम प्रगतीपथावर असून लवकरच त्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
दुचाकी रूग्णवाहिकांमध्ये अद्ययावत सुविधा
या दुचाकी रूग्णवाहिकांमध्ये स्ट्रेचर, ऑक्सिजन कीट, लाइट, फॅन, आयसोलेशन कॅबिन अशा सुविधा आहेत. या दुचाकी रूग्णवाहिका पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण, दुर्गम भागात नक्कीच फायदेशीर ठरतील, असा विश्वास अलर्ट सिटीझन फोरमकडून व्यक्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णवाहिकांची कमतरता आहे. त्यातच अनेक गाव-पाड्यांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचत नाहीत. त्यामुळे दुचाकी रूग्णवाहिकांचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा - तुरुंगात पिण्यासाठी पाणी अन् कमोड नाही; पप्पू यादव बसले उपोषणाला
हेही वाचा - Happy International Nurses Day: सचिनने नर्सेसच्या सन्मानार्थ बदलला डीपी, लिहला 'हा' खास संदेश