पालघर/नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे झोपड्यांतील गॅरेजला आग लागली असून या आगीत दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. आग कशी लागली हे समजू शकले नाही. मात्र पेटती सिगारेट टाकल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुदैवाने जीवितहानी नाही
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत एका मागोमाग चार ते पाच झोपड्यांनी पेट घेतला. याबाबतची माहिती तिथल्या नागरिकांनी वसई महापालिकेच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविली. यात एक चारचाकी व भंगारांची गोदामे जळून खाक झाली आहेत. तर संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पसरले होते.
लाखो रुपयांचे नुकसान
अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक जवानांच्या पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत इथल्या व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भंगार दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी विडी, सिगारेट ओढताना ही आग लागली असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.