नालासोपारा (पालघर)- विरारच्या विजयवल्लभ हॉस्पिटलमध्ये झालेल्या जळीतकांड प्रकरणी अटक असलेल्या दोन्ही व्यवस्थापक डॉक्टरांचा जामीन अर्ज शुक्रवारी वसई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विजयवल्लभ हॉस्पिटलमध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये १५ निष्पाप कोरोना रुग्णांना प्राण गमवावा लागला होता.
या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ . दिलीप शहा, डॉ. वस्तीमल शहा, डॉ . शैलेश पाठक तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची चौकशी आणि तपास करणारे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने डॉ. दिलीप वस्तीमल शहा ( ५६ ) आणि डॉ . शैलेश धर्मदेव पाठक ( ४७ ) यांना 24 एप्रिलला संध्याकाळी हॉस्पिटलमधून ताब्यात घेऊन चौकशीसाठी नालासोपाऱ्याच्या पोलीस ठाण्यात आणले. चौकशीअंती त्या रात्री दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.
जामीन अर्ज फेटाळला-
पुढे तीन दिवस न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर २८ एप्रिलला दोघांची रवानगी ठाणे कारागृहात केली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी वसईच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही पक्षांचे ऐकून घेतल्यानंतर दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दुजोरा दिला आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ . दिलीप शहा , टी. बस्तीमल शहा , ही. शैलेश पाठकवर गुन्हे दाखल करण्यात आले हाते.