पालघर - तांदुळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. हे पर्यटक किल्ल्यावर फिरायला आल्यानंतर पायवाट विसरल्याने भरकटले होते. या तरुणांची आता सुटका झाली आहे.
पालघर तालुक्यातील तांदुळवाडी किल्ला तरुणाईला नेहमीच आकर्षित करतो. यामुळेच मुंबई आणि ठाणे येथील २१ तरुण-तरुणी हा किल्ला पाहण्यास आले होते. दिवसभर किल्ल्यावर भ्रमंती केल्यानंतर या सर्व तरुणांनी किल्ला उतरण्यास सुरुवात केली. मात्र, खाली उतरण्याची पायवाट चुकल्याने ते किल्ल्यावरच भटकत राहिले. मात्र, त्यांना पायवाट सापडली नाही. यानंतर अंधार दाटल्याने हे सर्व पर्यटक किल्ल्यावरच अडकले. या भागात बिबटे आणि हिंस्र श्वापदे असल्याने या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. त्यातील काही पर्यटकांनी पालघर पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क साधून मदत मागितली. यानंतर सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांनी काही ग्रामस्थ, पोलीस पाटील यांना सोबत घेऊन पर्यटकांना खाली आणण्यास मदत केली.