पालघर - केवळ 500 रुपयांसाठी पिळवणूक होत असल्याने एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोखाडा येथील काळू पवार या 48 वर्षीय मजुराने मालकाच्या पिळवणुकीला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रामदास कोरडे असे पिळवणूक करणाऱ्या मालकाचे नाव आहे. या प्रकरणी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालकाच्या पिळवणुकीला कंटाळूनच उचलले टोकाचे पाऊल -
मोखाडा येथील काळू पवार यांच्या 12 वर्षीय मुलाचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने काळू पवार यांनी गावातीलच रामदास कोरडे या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले. या 500 रुपयांची परतफेड करण्यासाठी रामदास कोरडे यांनी काळू पवार यांची पडेल त्या कामासाठी गडी वापर करायला सुरुवात केली. तसेच त्या 500 रुपयांची मागणी करत काळू पवार यांची पिळवणूकही सुरू केली. या पिळवणुकीला कंटाळून काळू पवार यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मालकाच्या पिळवणुकीला कंटाळूनच काळू पवार यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप काळू पवार यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे.
मालकाविरोधात गुन्हा दाखल -
या प्रकरणी मयत काळू पवार यांच्या पत्नींनी त्याच्या पतीचे मालक रामदास कोरडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केला आहे.
'देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट'
पालघरमध्ये एका मजूराने मुलाच्या अंत्यविधीसाठी 500 रूपये घेतले हाेते. त्याची फेड करण्यासाठी त्याला वेठबिगारी करावी लागते आणि त्यादरम्यान त्याला मारहाण होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर वेठबिगारीचे काम आणि कामवर होणारी मारहाणीला कंटाळून मजुराला आत्महत्या करावी लागते ही अंत्यत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस लवकरच योग्य ती कारवाई करतील याची आशा आहे, असे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -विदारक! मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला; एका मजुरासह 80 मेंढ्यांचा मृत्यू