पालघर/वसई - दरवर्षी श्रावण महिन्यात विविध प्रकारच्या गावठी भाज्या व रान भाज्या विक्रीसाठी वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधव आठवडी बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्याने ऐन सणासुदीच्या काळात या भाज्या रस्त्याच्या कडेला बसून विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
वसईच्या पूर्वेतील ग्रामीण भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गावठीभाज्या, रानभाज्या यांची लागवड केली जाते. सणासुदीचा काळ सुरू होताच या भाज्या चांगल्या तयार होतात. भाज्यांमध्ये कारले, शीरघोसला, टाकला, अंबाडीची पाने, कंटोळ, गवती चहा, दोडकी, डांगर, आलुची पाने, भाजा, दुधी, काकडी, भेंडी, टरबूज, कोवाली, दिंडे , कोवळ्या, या भाज्यांचा समावेश आहे.
या तयार झालेल्या भाज्या ग्रामीण भागातील महिला बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जातात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, यावर्षी करोनाच्या महामारीमुळे या भाज्यांची विक्री करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने आता या महिलांना आपला तयार झालेला भाजीपाला, व गावठी फळभाज्या घेऊन रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली अशा ठिकाणी विक्रीसाठी बसावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणासुदीला या भाज्यांना चांगली मागणी असते. कारण या भाज्या कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून न वाढविता या भाज्या नैसर्गिक खतांचा वापर करून वाढविल्या जात असल्यामुळे आरोग्यासाठी या फळभाज्या उपयुक्त ठरतात. फक्त दोन ते अडीच महिन्यापर्यंतच याची आवक बाजारात असते. परंतु आठवडीबाजार सुरू नसल्याने या भाज्या घेऊन रस्त्याच्या कडेला बसून राहावे लागत आहे. बाजार सुरू असतो तेव्हा त्याठिकाणी भाज्या खरेदीसाठी नागरिक येत असतात. आता रस्त्याच्या कडेला फक्त गाडीतून जाणारे काही नागरिक आमच्या कडून भाजी करीत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सध्याची स्थिती अधिकच बिकट असल्याने मिळेल त्या भावात भाजी विकावी लागत आहे.
आठवडी बाजार बंदचा परिणाम..
कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील चार महिन्यांपासून विविध ठिकाणच्या गावा गावात भरणारे आठवडी बाजार बंद आहेत. या बाजार बंदीचा विपरीत परिणाम सणासुदीच्या काळात भाज्यांची विक्री करणाऱ्या महिलांवर झाला आहे. त्यातच आता रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करतो. त्यातून जास्तप्रमाणात भाजी विकली जात नाही. तर शहरी भागातील स्टेशन सारख्या ठिकाणी भाजी विक्रीला घेऊन जायचा विचार करतो परंतु तिथे गेलो तर प्रवास भाडे, बाजार पावती हा खर्च ही परवडणारा नाही. त्यातच काही वेळा पालिकेची गाडी येऊन माल उचलून घेऊन जाईल याचीही भीती असते. त्यामुळे आता जे काही पदरी पडेल त्यावरच आम्ही अवलंबून असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. जर नागरिकांनी आम्ही मेहनत करून पिकविलेल्या ताज्या व चांगल्या भाज्या खरेदी केल्या तरी यातून चांगला दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.