पालघर/वसई : वसई-विरार शहरात वाहनांची वाढती संख्या, अपुरे रस्ते यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटील होत असतानाच आता शहरात विविध ठिकाणच्या नाक्यावर , रस्त्यावर तयार होणाऱ्या बेकायदेशीर रिक्षा थांब्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडली आहे.
परिवहन विभागाकडून रिक्षाचे परवाने खुले होताच शहरात रिक्षांची संख्या वेगाने वाढली. वसई-विरार शहरात ३० हजारांहून अधिक रिक्षा असून त्यात हजारो बेकायदेशीर रिक्षांचा समावेश आहे. त्यातच शहरात जागोजागी बेकायदेशीर रिक्षा थांबे तयार होऊ लागले आहेत. यावर वाहतूक व परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्याने याचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले आहे. वाहतूक व परिवहन विभागाकडून १५० रिक्षा थांब्याचे सर्वेक्षण केले आहे. मात्र, शहराच्या विविध ठिकाणच्या भागात बेकायदेशीर रिक्षा थांबे तयार होऊ लागले आहेत.
अनेक राजकीय पक्षांनी आपल्या रिक्षा संघटना स्थापन केल्या असून नाक्या-नाक्यावर रिक्षा थांबे तयार केले आहेत. अशा बेकायदेशीर रिक्षांच्या थांब्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. तर दुसरीकडे रिक्षामध्येच थांबवणे, प्रवाशांना मध्येच रिक्षात बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे, असे प्रकार सुरू असतात. अशा प्रकारामुळे अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीर थांब्यामुळे वाहने वळविण्यास व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
शहरातील रिक्षा थांबे अनिश्चित
पालिका, वाहतूक विभाग, परिवहन विभाग यांच्या मार्फत शहरात रिक्षा उभे करण्यासाठी थांबे निश्चित करणे गरजेचे आहे. परंतु, शहरातील रिक्षा थांबे अजूनही निश्चित न करण्यात आल्याने अनिश्चित राहिले आहे. यामुळे शहरात जागोजागी बेकायदेशीर रिक्षा थांब्याचे पेव फुटू लागले आहेत. यासाठी शहरातील रिक्षा थांबे निश्चित करण्यात यावे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अडथळ्यातून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुन्हा सर्वेक्षण करणार
शहरातील रिक्षा थांबे अधिकृतरित्या निश्चित करण्यात न आल्याने त्यांचे पुन्हा परिवहन, पालिका आणि वाहतूक विभाग यांच्यामार्फत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
याआधीही सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. त्यावेळी केवळ १५० ते २०० रिक्षा थांब्याचे सर्वेक्षण झाले होते. परंतु, आता वाहनांची वाढती संख्या, जागा अशा अनेक समस्या आहेत. यासाठी पुन्हा सर्वेक्षण करून यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे.