विरार (पालघर) - येथील विरार पूर्व कणेर परिसरातील एका गॅरेजमध्ये गाडी धुण्यासाठी बनवण्यात आलेल्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली. विरार पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू अशी केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
बिपीन राऊत यांचे विरार पूर्व कणेर राई पाडा परिसरात सिद्धेश गॅरेज आहे. लॉकडाऊनमुळे हे गॅरेज बंद होते. या गॅरेजच्या सुरक्षारक्षकाची ३ वर्षाची नात परिसरात खेळत होती. खेळता खेळता ती गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली आणि दरम्यान बुडून तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा-गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या; पाच किलो गांजा जप्त
पावसामुळे गॅरेजच्या रॅम्पमध्ये पाणी साचले होते. गॅरेजच्या जवळ कुणी वास्तव्यास नसल्याने या घटनेचा अंदाज आला नाही. जेव्हा मुलीला शोधण्यासाठी कुटुंबिय बाहेर पडले तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या खड्ड्यात आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. या संदर्भात कुणाची तक्रार नसल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.