पालघर - जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. पालघर, डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहात असून जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. तर धामणी धरण 96.22 टक्के भरले असून धरणाचे तीन दरवाजे सुमारे दीड फूटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.
धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून सूर्या नदीत सुमारे 10 हजार 604 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही धोक्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - लोणावळ्यात 24 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद; डोंगर-दऱ्यातील धबधबे प्रवाही
जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धामणी व कवडास या दोन धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतीसाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणांतून वसई - विरार महानगरपालिका, पालघर, डहाणू शहर, डहाणू-अदानी विद्युत प्रकल्प, बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्र आदींसह इतरत्र पाणीपुरवठा केला जातो.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 'बायपास रोड'वरून, वाशिष्ठी पुलावर अद्यापही पाणी