पालघर- दोन महिन्यापासून बंद असलेले तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. कारखान्यातून सांडपाणी प्रक्रियेविना नाले, खाडीत सोडण्याचे परिणाम लगेचच दिसू लागले आहेत. बोईसर जवळील दांडी- नवापूर खाडीमध्ये हजारोच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळले आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश उद्योग बंद होते. कारखाने बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रातील आसपासच्या परिसरातील समुद्र आणि खाडीतील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. मात्र, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अटी-शर्तीसह कारखाने व उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू झाले असून कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत व नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे. हे सांडपाणी खाडीत मिसळल्याने गेल्या दीड महिन्यापासून स्वच्छ असलेल्या खाडीतील पाण्याला रासायनिक रंग प्राप्त झाला आहे. पाण्यातील प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याने दांडी- नवापूर खाडीत हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येत आहे. या प्रदूषणकारी कारखान्यांंवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.