पालघर - पंचायत समिती महिला व बालविकास प्रकल्प, आरोग्य विभाग आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, "वाडा तालुक्यातील 70 महिला बचत गटांना पंचायत समितीच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच महिला बचत गटांना व्यवसायिक विक्रीसाठी जिल्हा परिषदेतर्फे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल" असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.
7 डिसेंबरला वाडा येथे हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांना साहित्य विक्रीसाठी स्टॉलदेखील उपलब्ध करून देण्यात आले होते. या महिलांनी बचत गटामार्फत बनवलेल्या साहित्यासह शेतातील मालही प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवला होता. यावेळी महिलांना, उत्पादन, पॅकींग, विक्री, आरोग्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन
आरोग्या विभागाकडून महिलांच्या आरोग्याची तपासणीदेखील या मेळाव्यात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील, सहायक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, महीला व बालविकास प्रकल्पाचे गोरक्ष खोसे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.