पालघर - तुळींज पोलीस ठाण्यातील हवालदार सखाराम भोये यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हणत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि पोलीस महासंचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तपास करावा आणि राष्ट्रीय पोलीस आयोगाने सुचवलेल्या शिफारशी लवकरात लवकर अंमलात आणाव्यात, अशी मागणी पंडित यांनी केली आहे.
राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची गरज -
नालासोपारा पूर्वकील तुळींज पोलीस ठाण्यातील हवालदार सखाराम भोये यांनी गुरुवारी पोलीस ठाण्याच्या अँटी चेंबरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही गंभीर बाब आहे. ते कोणत्यातरी मानसिक ताण तणावाखाली होते. पोलीस शिपाई म्हणून ज्या वेळेला दाखल होते, त्यावेळेला त्याच्या प्रमोशनचा, कामाच्या तासाचा प्रश्न तसेच इतर असंख्य अडचणी असतील, हे सर्व प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत. त्यांच्या कामाच्या तासांमुळे पोलिसांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसदल, विशेषत: गृहमंत्री आणि महासंचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. या घटनेतून पुन्हा एकदा राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पोलीस आयोगाने ज्या शिफारशी सुचवल्या होत्या त्या लवकरात लवकर अमलात आणाव्यात, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षकाच्या दालनातच केली आत्महत्या -
नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील सखाराम भोये वय वर्ष (वय 42 वर्षे) यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. ते मानसिक तणावात होते का? किंवा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, यामागे काय कारणे होती, याचा तपास झाला पाहिजे, असेही पंडीत म्हणाले.
आत्महत्येने पोलीस दलात खळबळ -
मागील चार वर्षांपासून पालघर पोलीस दलात सखाराम भोये कर्तव्य बजावत होते. तुळींज पोलीस ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत कार्यरत होते. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी, असा परिवार आहे.