पालघर- दांडी येथील 'हिरा देवी' ही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली असता बुडल्याची घटना घडली आहे. मात्र बुडणाऱ्या नौकेतील मच्छिमारांनी मोबाईलद्वारे मदतीसाठी संपर्क साधला. मदतीसाठी आलेल्या इतर नौकेतील मच्छीमारांमुळे 5 खलाश्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून नौकेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
काही वेळाने दांडी येथील विठ्ठल आरेकर यांची कल्पतरू आणि राजेंद्र पागधरे यांची अमर लक्ष्मी या दोन नौका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आपला जीव वाचविण्यासाठी समुद्रात तरंगत असलेल्या 5 मच्छीमारांना वाचविण्यात या दोन्ही नौकेतील मच्छीमारांना यश आले. तसेच समुद्रात बुडणाऱ्या दुर्घटनाग्रस्त नौकेला दोरखंडांच्या साहाय्याने टोचन करून किनाऱ्यावर आणण्यात आले.
नौकेतील डोल जाळी देखील समुद्रात वाहून गेल्याचे नौका मालकानी सांगितले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने रस्ता नौका मालकाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस कुंदन दवणे यांनी केली आहे.