पालघर/वसई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वसईकरांना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 35 गावांचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन प्रचार धुमाळीत दिले होते. मात्र, वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असली तरी गावे वगळण्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने ही गावे लवकर वगळावी यासाठी 'मी वसईकर अभियान'च्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मौन अभियान राबवून स्मरण करुन दिले.
यावेळी गावांसाठी प्रत्येक गावच्या एका प्रतिनिधीने आपल्या गावाच्या नावाचा फलक सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना गावांचे आश्वासन स्मरण करण्यासाठी दोन तासांचे मौन पाळले. वसई पश्चिमेकडील नरवीर चिमाजी आप्पा मैदानाबाहेर हे अभियान राबविण्यात आले.
या गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ३५ गावे वगळण्याबाबत शासनाच्या ५ एप्रिल २०१० रोजीच्या प्रारूप अधिसूचनेचा आधार घेऊन शासनाने २९ आणि ६ अशी एकूण ३५ गावे महापालिकेतून वगळण्याची नव्याने अधिसूचना काढली तर गावे वगळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा आणि गावे वगळावी, अशी मागणी देखील मी वसईकर अभियानातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही गावे वगळण्यात यावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. पुन्हा त्याचे स्मरण करून देण्यासाठी गावांच्या नावाचे पोस्टर घेऊन आंदोलन केले.
या आंदोलनात शिवसेनेचे विजय पाटील, मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.