पालघर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व आहे (eknath shinde in palghar). त्यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत गेले. मात्र पालघर जिल्ह्यातील काही मोजकेच पदाधिकारी शिंदेच्या गळाला लागले होते. आता मात्र राज्याचा कारभार सुरळीत झाल्यानंतर आणि न्यायालयीन लढाई लांबणीवर गेल्याने एकनाथ शिंदे यांनी आपले लक्ष पुन्हा एकदा पालघर शिवसेनेकडे वळवले आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य शिंदेच्या गटात सामील झाले आहेत (shivsena workers from palghar joined shinde)
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. येथे सर्वाधिक 20 सदस्य हे शिवसेनेचे आहेत. जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. येथे निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, जिल्हा प्रमुख वैभव संख्ये, उपजिल्हा प्रमुख जगदीश धोडी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील यांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना गळाला लावले. हा उध्दव ठाकरे यांना पालघर जिल्ह्यात बसलेला मोठा धक्का मानला जातो आहे (setback for uddhav in palghar). या घटनेचे पडसाद ग्रामपंचायत निवडणूकीत सुद्धा उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्हा परिषदेतील 20 पैकी 13 जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात आल्याचा दावा शिंदे गटात सामील झालेले जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी केला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यानंतर ही शिंदे गटात शिवसेनेतून इनकमिंग होणार असल्याचे सूचक विधान जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी सकाळशी बोलताना केले आहे. मात्र आपल्यावर शिंदे गटात येण्यासाठी दबाव आणला गेला का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे वाढाण यांनी टाळले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण शिंदे गटात गेल्याचे वैभव संखे यांनी म्हटले आहे.
नेते, लोकप्रतिनिधी गेले मात्र शिवसैनिकांची निष्ठा मातोश्रीवरच: एकनाथ शिंदेंनी पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांना आपल्याकडे ओढल्याने पालघर जिल्ह्यात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. नव्याने नियुक्त्या केलेले पदाधिकारी देखील शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत. मात्र ज्या शिवसैनिकांनी शिंदे गटात गेलेल्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी मेहनत घेतली, त्या सामान्य आणि तळागाळातील शिवसैनिकांची श्रध्दा बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री आणि उध्दव ठाकरे प्रती कायम असल्याचे दिसून येते आहे. याची प्रचिती आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत येण्याची अपेक्षा आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांपुढे ही आव्हान: शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यातील आदिवासी भाग आणि काही अंशी सागरी पट्ट्यातील शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. तेथे जिल्हा प्रमुखासह इतर विश्वासू पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांच्या पुढे आहे. तर नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपल्याकडे आलेत, मात्र तळागाळातील आणि सामान्य शिवसैनिकांचा विश्वास आपल्या प्रती निर्माण व्हावा हे आव्हान एकनाथ शिंदें समोर आहे.