पालघर (वाडा) - राज्यात भाजपकडून महाजनादेश यात्रेनंतर राष्ट्रवादीकडून 'शिवस्वराज्य संवाद' चालवली जात आहे. असे असताना आता पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडून गोरगरिबांच्या आणि शेतकरीवर्गाच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'माऊली संवाद' सुरू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि डहाणू मतदारसंघात शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रविंद्र फाटक यांच्याकडून हा माऊली संवाद साधला जात आहे. राज्यात भाजपकडून महाजनादेश यात्रा तर पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडून माऊली संवादातून गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेण्यात येत आहे. तसेच मतदारसंघाची चाचपणीही या माध्यमातून होत असल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीच्या सरकारची विकासाची बाजू हा विविध संवादातून मांडली जात आहे. तर सरकारच्या विरोधाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवस्वराज्य संवादाच्या माध्यमातून उठवली जात आहे. अशाप्रकारे विविध संवादातून आज जनसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे.
तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद होत असल्याची माहिती शिवसेना विक्रमगड तालुकाप्रमुख सागर आळशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.