पालघर - 'गडचिंचले येथे जमावकडून तिघांची हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयडीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही सर्व घटना गैरसमजातून घडली असून या प्रकरणाला धार्मिक रंग घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,' असे आवाहन शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आज पालघर येथे शिंदे यांनी जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच गडचिंचले प्रकरणाविषयी देखील त्यांनी माहिती घेतली त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या परिसरात अफवांना पेव फुटले असून त्यासाठी गावागावांत जनजागृती सुरू आहे. लोक एकत्र जमू नये यासाठी गावागावात देखील पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे. अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.