पालघर- नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी शहरातील दोन रुग्णालयांमध्ये मिळून दहा गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी विनायक रुग्णालयात दिवसभरात ७, तर रिद्धीविनायक रुग्णालयात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच या रुग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर उशिरा रात्री पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला.
नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. अखेर तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजावून शांत केले.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा
रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा होता; पोलिसांचं स्पष्टीकरण..
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील दोन रुग्णालयांमध्ये १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक रुग्णालयात जमा झाले होते. एका रुग्णालयात सात कोरोनाबाधित दगावले आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर दुसऱ्या रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तुळींज आणि नालासोपारामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर जवळून देखरेख ठेवण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉक्टरांनी मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन, त्यांना आपल्या सोईने रुग्णालयाचे बिल जमा करायची मुभा दिली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. विनायक रुग्णालयात सायंकाळी सात वाजेपर्यंत पुरेल एवढा ऑक्सिजन साठा होता. तसेच, दुपारी साडेतीनच्या सुमारास आणखी ऑक्सिजन रुग्णालयात आणण्यात आला होता असे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, अचानक एवढ्या रुग्णांचा मृत्यू कसा झाला, याबाबत डॉक्टरांनाच माहिती असेल असे ते म्हणाले. सध्या वातावरण शांत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटली; 6 हजार 905 नव्या रुग्णांची नोंद, 43 रुग्णांचा मृत्यू
ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्याचे किरीट सोमैया यांचे ट्विट..
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी ऑक्सिजन पुरवठ्यातील त्रुटीमुळे नालसोपारामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याचे ट्विट केले आहे. सोमैय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई जवळील विनायक रुग्णालय नालासोपारा येथे 7 कोव्हीड रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
काल रात्रीपर्यंत वसई विरार महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर कोणतेही वरिष्ठ अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.