पालघर - बोईसर विधानसभेची जागा युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली आहे. येथून विलास तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. ही जागा भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांना द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
जनाठे यांना उमेदवारी न दिल्यास युतीचे काम न करण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. गुरूवारी संतोष जनाठे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पालघर तालुक्यातील मनोर येथे जनाठे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत बोईसर विधानसभा मतदारसंघात युतीचे काम न करण्याचा पवित्रा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - पालघर जिल्ह्यात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा जप्त
निवडणूक लढविण्यास पैसे नसले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हिमतीवर मी निवडणूक लढवणार, असल्याचे भावनिक आवाहन जनाठे यांनी कार्यकर्त्यांना केले.
पालघर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असून यातील 3 मतदारसंघ शिवसेनेला व 3 मतदारसंघ भाजपला, असा युतीचा फॉर्म्युला आधीपासूनच आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यावेळी सहापैकी 4 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. पालघरमधील वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर या विधानसभा जागा युतीकडून शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर युती विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे.
हेही वाचा - बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज