वसई (पालघर) - महापालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरण सोहळ्यात झालेल्या मनसेच्या राड्यानंतर वसईत हे प्रकरण चिघळू लागले आहे. मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा केला होता. त्यांना कार्यक्रमाबाहेर काढताना पोलिसांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
आमचा पोलीस प्रशासनावर रोष नाही-
या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मनसेचे नेते संदीप देशपांडे, महाराष्ट्र सचिव सचिन मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी झोन ३ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आले होते. आमचा पोलीस प्रशासनावर रोष नाही. मात्र येत्या मंगळवारपर्यंत कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व महिला तुळींज पोलीस ठाण्यावर धडकतील असा इशारा, संदीप देशपांडे यांनी पोलीस उपयुक्तांच्या भेटीनंतर दिला आहे.
पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी-
मंगळवारी परिवहन सेवा नूतनीकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण करत बाहेर काढले होते. व त्याचवेळी पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ केली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अशा प्रकारे शिविगाळ व मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा- प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड आग