पालघर - संकटाच्या काळात हातात हात घालून काम केले पाहिजे. घाम गाळणाऱ्या शेतकरीवर्गाला मदत मिळेल. आता राज्याकडून आलेली मदत पहिला टप्पा आहे. नुकसानीचा आकडा आल्यानंतर केंद्राकडून नुकसानीसाठी निधी मिळेल. सरकारची सर्व तिजोरी जनतेसाठी आहे. टीका करणाऱ्यांच्या काळात सरकारची तिजोरी ठेकेदाराची होती, असा टोला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.
सदाभाऊ खोत यांनी वाडा तालुक्यातील कुडूस, खुपरी आणि गातेस या गावातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. कुडूस येथील पांडूरंग पष्टे, ताराम पष्टे, खुपरी मधील नितीन ठाकरे, जगदीश पाटील, तर गातेस मधील नितीन गोतारणे, रमेश गोतारणे आदी शेतकऱ्यांच्या भातपिकांची पाहणी केली. तसेच शेतकरी वर्गाला आघाडी सरकारपेक्षा जास्त मदत देणार असल्याचेही खोत म्हणाले.
अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील कुडूस, खुपरी, गातेस तसेच पालघर तालुक्यातील हलोली या ठिकाणी पाहणी केली. यावेळी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल पाठवा, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत, आमदार प्रवीण दरेकर, भाई गिरकर, मनिषा चौधरी यांच्यासह सर्व विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.